Wednesday, 20 August 2014

Shirkyache Lonche - Sweet, Spicy & Sour Mango Pickle in Vinegar

बाईंचं शिर्क्याचं लोणचं 
बाई  (रमाबाई काशिनाथ गुप्ते)


रमाबाई काशिनाथ गुप्ते -  मुलं, जावई - सुना आणि नातवंडांसाठी मात्र फक्त 'बाई'.

बाई वारल्या १९६३ साली तेव्हा त्यांचं वय  ७४  वर्ष असावं. म्हणजे त्यांचा जन्म १८८९ सालचा. त्यांच्या मृत्यूला आता थोडीथोडकी नाही तर ४१ वर्षं झाली.  पण तरीही त्यांच्या बद्दलच्या  गप्पा-गोष्टींचा ओघ त्यांच्या कुटुंबात इतका सतत वहात असतो, कि असं वाटावं की त्या कुठे तरी थोड्याच अंतरावर अजूनही वास करत असाव्या.

 काशिनाथ मार्तंड गुप्ते म्हणजे 'बाबा' हे बडोदे सरकारात वरिष्ठ  हुद्द्यावर एक निस्पृह अधिकारी होते. त्यांच्या हयातीत त्यांनी ना स्वत:चं घर बांधलं, ना जमीन जुमले घेतले ना लाखोंच्या ठेवी जमा केल्या. पण आपल्या मुलांना आणि मुलींना अतिशय प्रोग्रेसिव्ह वातावरणात हवं तेवढं शिकू देऊन जातपातीची  आडकाठी न करता मनपसंत जोडिदार शोधण्याची पूर्ण मुभा त्या काळातही, न मागता, त्यांनी देऊन ठेवली होती!

बाबा स्वत: एक उत्तम ब्रिज आणि बुद्धीबळ प्लेयर  तर होतेच पण संस्कृतचे स्कॉलर होते आणि वाचनाचा भरपूर व्यासंग त्यांना होता.  बाबांनी   तुकारामाचं महत्त्व  आपल्यावर बिंबवलं असल्याची   नोंद बाबांचे नातू सुप्रसिद्ध कवी दिलीप चित्रे ( 'Says Tuka' fame)  यांनी आवर्जून करून ठेवली आहे.  दिलिप हे  'अभिरुची' कार दंपती विमल  आणि बाबुराव चित्रे यांचा मुलगा.  दिलीपची आई विमल ही बाई - बाबांची अतिशय लाडकी, तडफदार मुलगी. शिकलेल्या मुलींचं बाबांना खूप कौतुक होतं आणि त्यांच्या बरोबर संवाद साधायला त्यांना अतिशय आवडे.

नातवाला अशी तुकारामाची गोडी लावणाऱ्या बाबांनी  देव-देव मात्र कधीही केला नाही हे विशेष. प्रार्थना समाजिस्ट बाबांच्या आयुष्यात मूर्तिपूजेला स्थान नव्हतं, पण  कोनाड्यातील बाईंच्या चार देवांना त्यांची आडकाठीही नव्हती. अशा या एकमेकांना विचार आणि आचार स्वातंत्र्य देणाऱ्या पती-पत्नीं मध्ये कमालीचं सामंजस्य होतं. बाबांच्या पुरोगामी विचारसरणीला बाईंनीही मनापासून साथ दिली ही कौतुकाची बाब होती. बाबांनी मदत केलेल्या एका विधवा-विवाहात बाईंनी वधूची ओटी भरल्याची बातमी  बाबांच्या गावातील घरी पोहोचली आणि घरातील सर्व बायकांनी बाईंविरुद्ध बंड पुकारलं. पण बाबांच्या वडिलांनी मात्र आपल्या सुनेची बाजू घेऊन " आपल्या मुलाचा तो निर्णय होता ना ? त्याला नाही जाब विचारत तर तिला का दोष देता ? " असं त्यांना कसं खडसावलं ही गोष्ट बाईंचे मुलगे आणि मुली मोठ्या अभिमानाने आपल्या पुढ्च्या पिढ्यांना  सांगताना अनेकदा ऐकू येते.

त्या घराच्या पायाचा दगड अतिशय मजबूत होता. तो होता ती अखंड कर्मयज्ञ करणारी गृहस्वामिनी  - बाई - म्हणजे अखंड ऊर्जा.  चार मुली आणि आठ मुलगे, सुना, जावई आणि नातवंडं असं गोकुळ. मुला - मुलींचे मित्र मैत्रिणी, सुनांचे नातेवाईक, असं येत्या-जात्याचं घर, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता,  स्वत:चे शारिरीक कष्ट कामी लावून, जराही कुचराई न करता,  सतत हसतं - खेळतं आणि समाधानी ठेवण्याचं कसब त्या माऊलीत पुरेपूर होतं.  सुनेच्या बाळंतपणात तिच्या आईसारखं तिचं कोड-कौतुक पुरवायचं, तिला न्हाऊ खाऊ घालायचं यात बाईंचा हातखंडा होता. शिस्तीने आणि काटकसरीने घर चालवूनही, त्यात सतत प्रेम पेरत, अतिशय चविष्ट स्वयंपाक बनवून बाईंनी आपल्या मुलांना अशा काही सवयी लावून ठेवल्या की त्यात मुलंच नाही पण बाहेरून आलेल्या सुनाही पार 'बिघडून' गेल्या ! बडोदेशाही आणि सी के पी आवडी निवडी यांचं मिश्रण या स्वयंपाकात होतं. रोजची बिरडी, आंबट वरण आणि साध्या ताज्या भाज्या तर होत्याच पण चटण्या - लोणची होती, तुरीचे - वालाचे गुजराथी 'लीलवे' ही होते.  रविवारचं मटन, कलेजी,  भेजा किंवा खिमा होताच पण  कसलासा "विलास", नारायणदास, राघवदास, चुरम्याचे  असे  जबरदस्त नावाचे लाडू होते. रस-पुरी, शेवया अशा गोडाधोडाच्या इतर वस्तू होत्या. आजाऱ्याला ताकद यावी म्हणून  पाया सूप सारखे पौष्टिक पदार्थ होते.

त्या घरकामाच्या रामरगाड्यातून वेळात वेळ काढून लायब्ररीतून आणून नवनवीन पुस्तकंही बाई आवर्जून वाचायच्या एवढंच नव्हे तर आपल्या मुला - नातवंडांची  नावं  कादंबऱ्यातून निवडायच्या. कोकणातून आलेल्या बाईंना समुद्राचं खास प्रेम होतं आणि मुंबैला आल्यावर त्या समुद्र दर्शन हौसेने घेत. कित्येक कविता, ओव्या त्यांना तोंडपाठ होत्या. अशा अनेक गोष्टी ऐकल्या  कि त्यांच्या बद्दल अचंबा वाटल्यावाचून रहात नाही.

आपल्या घरगृहस्थीची सम्पूर्ण मदार बाईंवर सोपवून बाबा निश्चिंतपणे आपलं काम करत असत. निवृत्तीतील आयुष्यही तसेच निवांतपणे ते व्यतीत करत होते. मुलं-मुली आपापले संसार थाटून त्यात व्यग्र होते आणि बाई-बाबांच्या बडोद्यातील शहा बागेतील दुमजली भाड्याच्या घरात वारंवार हक्काने येऊन मनसोक्त गोंधळ घालून आराम करून जात होते. "बाई तुमचा ब्यांक अकाऊंट नाही?" असं विचारणाऱ्याना "माझं प्रत्येक मूल म्हणजे माझा एक ब्यांक अकाउंट आहे" असं शानदार उत्तर देऊन बाई गप्प करत होती. मुलांच्या घरी बाई - बाबा अधून मधून रहायला आले की बाईंनी आपल्या हाताने काहीतरी करून सर्वांना खाऊ घालण्याचं आपलं ब्रीद कधी सोडलं नाही. अशी ही कामाचा झपाट्याचा उरका  असलेली बाई अगदी क्वचितच आजारी पडली. अगदी शेवटचं आजारपणही केवळ दोन -तीन दिवसांचंच.  तोपर्यंत ती हसत मुखाने उभी होती आणि घराचे तीन जिने कित्येकदा चढून उतरून घर सांभाळत होती. ना तिला "नी रिप्लेसमेंट" ची गरज भासत होती ना कैल्शियमच्या डोसची.  अगदी अखेरच्या दिवशीही  घरात हजार असणाऱ्या सर्वांचं  हवं-नको पहात, त्यांंच्या पोटात घासभर अन्न जाण्याचं राहून जाउ नये याची सोय बिछान्यातूनही  करण्यात व्यग्र होती.

बाईंच्या घरातील प्रसन्न  वातावरणात वावरून त्यांचं प्रेम लुटलेल्या सुनांनी आपापले स्वतंत्र संसार थाटले तरी  -  आणि त्या स्वत:  कितीही उत्तम स्वयंपाक करू लागल्या तरी -  बाईंच्या हातच्या चवीचा त्यांनाही कधी विसर पडला नाही.  बाईंच्याकडून जे बरेच चवीचे जिन्नस त्यांनी उचलले त्यातील एक म्हणजे "शिर्क्याचं" लोणचं.


शिर्क्याचं लोणचं 
 
१ किलो कैरी किसून वाफवून घ्यावी. 
अडीच वाट्या काळं विनिगर  ( सिर्का) 
६ इंच आल्याचा तुकडा किसून घेणे. 
२ कांदे लसूण - सोललेल्या पाकळ्या 
अर्धी वाटी मीठ 
३७५ ग्राम साखर आणि  अर्धा किलो गूळ 
७-८ लवंगा, ४ -५ दालचिनीचे तुकडे, 
चवीप्रमाणे तिखट 
बेदाणे. 

विनेगर मध्ये गूळ, साखर व सर्व मसाले व बेदाणे  घालून उकळून घ्यावे. त्यानंतर त्यात कैऱीचा कीस  घालून घट्ट मोरांब्यासारखे परतावे. वाटल्यास अधिक साखर आणि तिखट त्यात घालावे. स्वच्छ काचेच्या बरणीत काढून  भरून ठेवावे. 



No comments:

Post a Comment