Sunday, 31 August 2014

Delicious Kheema - Sudha Thosar Style


Siblings Nalini, Jayant, Dinanath, Avi & Sudha on Sudha's 80th Birthday
सुध्या आत्त्या म्हणजे सुधा माधव ठोसर म्हणजे पूर्वाश्रमीच्या सुधा काशिनाथ गुप्ते म्हणजे बाईंचं (रमाबाई गुप्तेंचं) शेंडेफळ. बारा भावंडातील धाकटी लाडकी मुलगी.

घरच्या प्रथेप्रमाणे अभ्यास, खेळ आणि सर्व एक्स्ट्रा करिक्युलर बाबींमध्ये मुलींना भरपूर प्रोत्साहन होतं.  आणि त्यात त्यांना जास्त रस असल्यास स्वयंपाकाला अगदी दुय्यम स्थान होतं.  सुधाने या संधीचा उत्तम उपयोग करून घेतला आणि शाळेत आणि कॉलेजमध्ये अभ्यासाबरोबरच खेळातही  खूप प्राविण्य मिळवलं - मग ते ब्याड्मिंटन सारखे आउटडोअर खेळ असोत कि ब्रिजसारखे बुद्धीला तीक्ष्ण करून चालना देणारे बैठे खेळ असोत.

Madhav & Sudha : Youngest Couple Around
तोवर स्वयंपाकात लक्ष घालण्याची  जबरदस्ती कुठलीच नव्हती आणि त्यामुळे खरा खुरा सीरीयस स्वयंपाक करावा लागला तो एअर इंडीयात नोकरी करत असता माधव ठोसर  यांच्याशी भेट होऊन विवाहबद्ध झाल्यावरच असावा. विशेष म्हणजे नेहेमीच्या 'रुटीन' स्वयंपाकाचे धडे द्यायला  सासूबाईही  हयात नव्हत्या. पण ती उणीव भरून काढली समंजस सासरेबुवांनी. त्यांनी कुरबुर न करता अगदी उत्तम दही कसं लावायचं इथ्पासूनच्य़ा टिप्स आपल्या सुनेला दिल्या.

माधवकाका मुळात एअर फोर्स पायलट आणि सामिष आहारातही त्यांना रुची. पण खरी आवड चटण्या - कोशिंबरी आणि गोडधोडासकटच्या टिपिकल चारठाव जेवणाची. सुधाही काही लेची पेची नव्हती. खवय्यांच्या बडोदी घरात जन्मलेली,  म्हणजे  गुण नाही तरी वाण लागलेलाच. मग  कंबर कसून सुधाआत्त्या  सी के पी आणि कोकणस्थी, दोन्ही स्वयम्पाकात हां हां म्हणता तरबेज झाल्या. यात बिचारे सासरे आणि माधवकाका  यांच्या सहनशीलतेचीही दाद द्यायला हवी म्हणा !  


आज ऐंशी वर्षं ओलांडली तरी ब्रिजच्या राष्ट्रीय स्तरावरच्या च्याम्पियनशिप्स मध्ये सुधाआत्त्या  अजूनही भाग घेत असतात. मधूनच एखाद्या वृत्तपत्रात किंवा इंटर्नेट्वर सुधा ठोसर हे नाव ब्रिज टूर्नामेंट साठी डोकावून जातं ! बस आणि ट्रेनने मुंबईच्या धकाधकीत प्रवास करायलाही त्या मागे बघत नाहीत.  आणि मुलगा, सुनबाई आणि नातवंडांना भेट द्यायला दर वर्षी अमेरिकेचा दिवसभराचा दगदगीचा प्रवासही दोघं नवरा बायको व्यवस्थित पार पाडतात. 


दादर आणि माटुंगा क्लब सारख्या संस्थांमध्ये त्यांचा सहभाग असतो. नवीन नाटकं आणि सिनेमे एकत्र ते आवर्जून पहातात. पण स्वत:च्या आवडीची चांगली पुस्तकं वाचणं, आवडते टी व्ही प्रोग्राम बघणं  आणि आपापल्या फ्रेंडसर्कल्सच्या कार्यक्रमांमध्ये स्वतंत्रपणे भाग घेणं अशा माध्यमांतून दोघांनीही व्यक्तीस्वातंत्र्यही तितकंच अबाधित  ठेवलं आहे.


ठोसर पती-पत्नींचा फिटनेस आणि उत्साह खरोखरच विशीच्या तरुणालाही लाजवणारा आहे. आणि याचं रहस्य त्यांच्या आहारात असण्याची दाट शक्यता आहे. कारण विशेष म्हणजे अगदी दोघांचाच स्वयंपाक करायचा असला तरी कंटाळा न करता अजूनही रोजची  जेवणंही  अगदी साग्रसंगीत अशी 'कम्पलिट मील्स'   सुधाआत्त्या स्वत:च्या हातांनी बनवतात.  भरपूर अठरापगड  मित्र परिवार आणि जिवंत सोशल लाईफ असल्या मुळे त्यांनी विविध प्रकारचे पदार्थ प्रयत्नपूर्वक शिकून घेतले आहेत. पण असं असलं तरी आपल्या आईच्या म्हणजे बाईंच्या काही रेसिपीज त्यांनी  आवर्जून लक्षात ठेवल्या आहेत आणि त्यांना स्वत:चा 'टच'ही दिला आहे. त्यातील एक पदार्थ मी उतरवून घेतला आहे :  खीमा.

आजच दुपारी या रेसिपी बरहुकूम केलेला खिमा सर्वसंमत झालेला आहे. अर्थात तरीही यात काही चूक असल्यास मला एक फोन येईल आणि सर्व चुका त्यातून सुधारल्या जातीलच ! तोपर्यंत होऊन जाऊ द्यात तुमच्याही घरी :


खीमा - सुधा ठोसर Ishtail

दीड किलो खीमा चाळणीवर स्वच्छ धुऊन घ्यावा.
 मसाला:
६ मोठे कांदे उभे चिरून तव्यावर  नुसतेच चांगले बदामी भाजून घ्यावे. टोम्याटो घालायचा असल्यास एक  टोम्याटो उभा चिरून कांद्यावर परतून घेणे.
३ मोठे टेबल्स्पून भरून सुकं खोबरं वेगळं भाजून घेणं, करपू न देता.
दीड टेबलस्पून खसखस आणि दीड टेबलस्पून तीळ भाजून घेणे.
थोड्याशा तेलात ८ लवंगा, २ इंच दालचिनी, २ टी स्पून मिरी, १ टी स्पून बडीशेप, अर्धा टी स्पून अक्खी मेथी, थोडी लसूण आणि थोडं आलं तळून घेणे.
हे सर्व पदार्थ बारीक वाटून घ्यावे.

५-६ वाट्या पाणी उकळत ठेवावे.

जाड बुडाच्या पातेल्यात बेताचं तेल गरम करून २- ३ तमालपत्र त्यात घालून खिमा चांगला परतावा व बेताची हळद घालावी. त्यानंतर  त्यात उकळतं पाणी घालून पहिली उकळी आली की वरील प्रमाणे वाटलेला मसाला घालावा व चार टीस्पून वा अधिक लाल तिखट व चवीपुरते मीठ घालावे. वर तवंग हवा असल्यास वरून तूप किंवा बटर घालावे. शिजल्यावर वरून बारीक चिरलेली कोथिम्बीर घालावी व हवी असल्यास उकडलेली अंडी घालावी.



















No comments:

Post a Comment